उदगीर (एल.पी.उगिले)
सध्या शासकीय पातळीवरून वृक्षारोपण करण्यासंदर्भात मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. शासकीय यंत्रणेच्या मार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांनी करमाफी तसेच इतर सवलती द्याव्यात आणि वृक्ष लागवड करून घ्यावी अशाही सूचना केल्या जात आहेत. काही स्थानिक स्वराज्य संस्था तशा पद्धतीने प्रयत्न करत आहेत. शासकीय पातळीवरून उदगीर तालुक्यासाठी पाच लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सांगितले आहे. मात्र ही वृक्ष लागवड होणार कशी ? यासंदर्भात कोणाकडेही नियोजन नाही. प्रत्यक्षात मात्र रोपवाटिका पाहिल्यास अडीच लाख ते तीन लाख इतकीच रोपे उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. मग दरवर्षीप्रमाणे 'जुन्या खड्ड्यात नवीन रोप' असा कार्यक्रम करून, फोटो सेशन केले जाईल. आणि सरकार दरबारी उद्दिष्ट पूर्तीच्या घोषणा केल्या जातील. मात्र हे होत असतानाच शासकीय पातळीवरून वृक्षतोड थांबवण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न होत आहेत? हे जनतेला कळाले पाहिजे. दररोज मोठमोठ्या ट्रक भरुभरु वृक्षतोड झालेली झाडे वाहतूक होताना लोक पाहत आहेत. उदगीर हे महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्रप्रदेश या तीन राज्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे या भागातून होणारी वृक्षतोड नेमकी जाते कुठे? हा संशोधनाचा विषय आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना तसेच उदगीर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी परवाना असलेल्या आणि परवाना नसलेल्या अनेक आरा मशीन रात्रंदिवस कार्यरत आहेत. त्याच्यावर नियंत्रण कोणाचे आहे? या बाबीकडे ही शासकीय यंत्रणेने पाहणे गरजेचे आहे. जोपर्यंत वृक्षतोडीला आळा बसणार नाही, तोपर्यंत वृक्ष लागवडीच्या घोषणा केवळ घोषणाच राहतील. शासकीय यंत्रणा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याच भरोशावर वृक्ष लागवड होणे शक्य नाही. सर्व नागरिकांनी वृक्ष लागवड ही राष्ट्रीय कार्य आहे. असे समजून प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, म्हणजे खऱ्या अर्थाने वृक्ष लागवड तर होईलच वृक्षतोडीच्या विरोधातही आंदोलन करायची मानसिकता नागरिकांमध्ये निर्माण होईल. अशी अपेक्षा इंदिरा गांधी वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित झालेले वृक्षमित्र डॉ. प्रकाश येरमे यांनी व्यक्त केली आहे.
शासकीय पातळीवर नेहमी बैठका होतात, यावर्षीही उदगीर तालुक्यासाठी पाच लाख 41 हजार वृक्षाची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने निडेबन आणि धोंडवाडी या दोनच ठिकाणी रोपवाटिका सुरू करण्यात आले आहेत. या दोन रोपवाटिकेत प्रत्येकी 64 हजार प्रमाणे एक लाख तीस हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. मग उर्वरित वृक्ष लागवड होणार कशी? हा संशोधनाचा विषय आहे. कारण वनविभागाच्या वतीने सुरू असलेल्या हनुमंतवाडी, करवंदी, हत्तीबेट, वायगाव, डिग्रस, हाकनाकवाडी, तोंडार, लोणी येथे प्रत्येकी जवळपास 32000 प्रमाणे दोन लाख रोपांची निर्मिती करण्यात येईल अशी शक्यता होती. मात्र प्रत्यक्षात किती रोपाची तूट आहे? हा संशोधनाचा विषय आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने दरवर्षी रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावल्याचे सांगितले जाते, मात्र ती जिवंत आहेत का? हा ही संशोधनाचा विषय आहे.
अनेक ठिकाणच्या रोपवाटिकेच्या ठिकाणी दर्जेदार रोपे उपलब्ध नसल्याची ओरड अनेक वेळा झाली आहे. मात्र त्याकडेही कोणी फारसे गांभीर्याने पाहत नाही. वृक्षारोपणाचा विषय संपला की सामाजिक वनीकरण विभाग कोणाच्या लक्षातही राहत नाही. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पाच लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कसे गाठायचे? हा प्रश्न नागरिकांनी स्वतः रोपे तयार करून दूर करणे गरजेचे आहे.
मध्यंतरीच्या काळात कारवा फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक शाळा शाळा मधून सीडबॉल निर्मिती कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्त्व आणि प्रशिक्षण दिले होते. मात्र दुर्दैवाने पुढे त्याचा पाठपुरावा केला गेला नाही. किंवा शासकीय पातळीवरून त्यांना प्रोत्साहन ही दिले गेले नाही. परिणामत: वृक्ष लागवडीच्या संदर्भात आणि संवर्धनाच्या संदर्भात लोक चळवळ बनावी अशी अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही.
लोकांना वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. अन्यथा मराठवाडा वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. अशी खंतही वृक्षमित्र डॉ. प्रकाश येरमे यांनी व्यक्त केली आहे.
उदगीर शहरात आणि परिसरात आरा मशीन मोठ्या प्रमाणात विनापरवाना असून या ठिकाणी वृक्षतोड केलेली झाडे खरेदी विक्री केली जात असल्याची चर्चा आहे.
उदगीर तालुक्यामध्ये उदगीर, हेर, वाढवणा, मोघा, तोंडार, देवर्जन, नळगीर, नागलगाव अशी एकूण आठ महसूल मंडळ आहेत. या प्रत्येक मंडळातून स्वतंत्रपणे प्रत्येकी चार ते पाच रोपवाटिका सुरू करणे आवश्यक आहे. कारण या रोपवाटिकेच्या माध्यमातून वृक्षारोपणासाठी लोकउपयोगी वृक्षांची रोपे तयार होतील, गाव पातळीवर मजुरांना रोजगार मिळेल, आणि राष्ट्रीय कार्यामध्ये हातभार लावता येईल असे होऊ शकेल. मात्र दुर्दैवाने हे कागदावरच होऊ नये म्हणजे मिळवले.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे या वृक्षारोपणाच्या संदर्भात खूपच संवेदनशील आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपणासाठी मोहीम सुरू केली आहे. शासकीय अधिकारी आज आहेत उद्या दुसऱ्या जिल्ह्यात जातील, मात्र आपण इथेच राहणारे आहोत. या वृक्षाचा लाभ आपल्यालाच होणार आहे. याचे गांभीर्य स्थानिक नागरिकांनी घेणे गरजेचे आहे. असेही आवाहन डॉ. प्रकाश येरमे यांनी केले आहे.
