मुखेड (एल.पी.उगीले)
मुखेड तालुक्यातील मारजवाडी येथील माजी सरपंच नारायणराव वडगावकर यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची आणि काँग्रेस पक्षाची एकनिष्ठपणे केलेली सेवा विचारात घेऊन त्यांना पंचायत समितीची उमेदवारी काँग्रेस पक्षाने द्यावी, आणि खा. वसंतराव चव्हाण यांनी सर्व ताकतीने त्यांना आशीर्वाद द्यावा. अशी मागणी युवा कार्यकर्त्याकडून केली जात आहे. या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी एक बैठक आयोजित करून माजी सरपंच नारायणराव वडगावकर यांना पंचायत समितीची निवडणूक लढण्याची विनंती केली आहे. पक्षश्रेष्ठींनी आणि विशेष करून खा. वसंतराव चव्हाण यांनी आपल्यावर विश्वास टाकून जर संधी दिली तर गोजेगाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढण्यास आपण पंचायत समितीची निवडणूक लढण्यास तयार असल्याचे नारायणराव वडगावकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.
नारायणराव वडगावकर यांनी मारजवाडी ग्रामपंचायत मध्ये तब्बल वीस वर्ष सरपंच पद भूषवले आहे. त्यांच्या कार्यकाळात गावाच्या विकासासोबतच सर्वसामान्य माणसांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले आहेत.तसेच तब्बल 35 वर्षापासून काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने एकनिष्ठपणे काम केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. काँग्रेस पक्षाच्या पाठबळावर नारायणराव वडगावकर यांनी बारा गावातील लेंडी संघर्ष समितीचा प्रश्न लावून धरून या आंदोलनात सिंहाचा वाटा उचलला आहे. संपूर्ण मुखेड तालुक्यांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. तसेच संघटन कौशल, नेतृत्व आणि शब्दाला जागणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला ही निवडणूक जिंकणे अत्यंत सोपे होईल असा विश्वासही कार्यकर्त्याकडून व्यक्त केला जातो आहे. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायचे असतील तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही युवक कार्यकर्त्याकडून मागणी केली जात आहे.
