Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्यार्थिनींच्या शाळेत जाणाच्या रस्ता मागणीला वाटाण्याच्या अक्षता



उदगीर (एल.पी.उगीले)

उदगीर शहरातील प्रभाग क्रमांक तीन व दोन मधील नगरपरिषदेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भगीरथ राजा नगर कादरी फंक्शन हॉलच्या पाठीमागील भगीरथ राजा वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून तेथील कमलेश्वर कन्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, आजूबाजूला शासकीय, निम शासकीय, वस्तीगृह व शासनमान्य वस्तीगृह, बालगृह, बाल सदन, बालिकाश्रम, बाल संगोपन केंद्र आहेत. तसेच धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेज कडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असलेला रस्ता आजही चिखलमय आहे. उदगीर विधानसभा मतदार संघाकरिता हजारो कोटी रुपयांचा निधी मतदार संघातील रस्ते, नाली, पेव्हर ब्लाॅक, इमारत बांधकाम, जलसंधारण, पाणीपुरवठा याकरिता आणल्याचा कांगावा केला जातोय. मात्र रस्ते नेमके कुठे झाले? असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. उदगीर शहरालगत असलेल्या भगीरथ राजा नगर येथे रस्त्या अभावी नागरिकांना कसरत करत चालावे लागते. पाऊस झाला की विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना शाळेत जाताना सुद्धा अडचणी येतात. येत्या शैक्षणिक वर्षांपासून लहान बालके, विद्यार्थी, विद्यार्थिनींना कमलेश्वर कन्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत जाण्यासाठी गुडघ्यावर चिखलातून पायपीट करीत आहेत. एका बाजूला मुलींच्या शिक्षणासाठी म्हणून मोठ् घोषणा सरकार करत आहेवि. मात्र प्रत्यक्षात शिक्षणासाठी जाण्याच्या रस्त्यात होणारे अडथळे दूर करत नाहीत, हे दुर्दैव म्हणावे लागेल. कन्याशाळा कडे जाण्याचा रस्ता तरी प्राधान्य क्रमाने केला जाणे अपेक्षित असताना त्यालाही वेळोवेळी फाटे फोडले जात आहेत. विद्यार्थिनींच्या या मागणीला वेळोवेळी वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. विशेष बाब म्हणजे गोरगरीब, पददलित, आठरापगड जाती धर्मातील लोक या भागात राहतात. त्यामुळे त्यांना कोणी वालीच उरला नाही की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातो.

या चिखलमय रस्त्यावरून धड चालताही येत नाही. गंभीर रुग्ण असेल तर त्याला हॉस्पिटलला घेऊन जाणे म्हणजे खाटेवर किंवा चौघांच्या खांद्यावर बाजेवरच न्यावे लागते. पावसाळ्यात तर जणू या भागाचा संपर्कच तुटतो. या भागातील पक्के रस्ते करावेत अशी मागणी मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे,तसेच जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर-घुगे, जिल्हा नियोजन समिती, उदगीर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, मुख्याधिकारी सुंदर बोंदर, नगरसेवक, माजी नगरसेवक  यांच्याकडे वेळोवेळी परिसरातील नागरिकांनी आणि विद्यार्थिनींनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.