उदगीर (एल.पी.उगीले)- ज्याचा आत्मविश्वास प्रबल आहे, ज्याची स्वयं अध्ययनावर निष्ठा आहे, तो माणूस स्वतःबरोबरच इतरांना देखील नवी दिशा देऊन अपयशावर विजय मिळवतो. जरी त्याला कुठलेही जात, धर्म आणि कुळभेद आड आले तरी तो साहस, त्याग, निष्ठा आणि समर्पण या आधारे स्वयंअध्यानाच्या जोरावर यशस्वी होतो. असा साहसी वीर धनुर्धर ज्याने स्वयंअध्ययनाच्या निष्ठेने कुळभेदालाही झुकवले तो म्हणजे एकलव्य होय.असे मत शौर्य पैके याने व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गत गेल्या 14 वर्षापासून अखंडितपणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी चालू असलेल्या वाचक संवादाचे 313 वे पुष्प रामराव मोमले यांचे अध्यक्षतेखाली विशेष बालवाचक संवाद म्हणुन संपन्न झाले. यामध्ये विजय देवडे लिखित एकलव्य या साहित्यकृतीवर सहाव्या वर्गात शिकणारा विद्यार्थी शौर्य अर्चना सिद्धेश्वर पैके पुढे बोलताना म्हणाला की, गुरूंची केवळ प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून धनुर्धर विद्येमध्ये पारंगत होणारा व गुरुदक्षिणा म्हणून या विद्येचे मुख्य आधार असणारा आपल्या उजव्या हाताचा अंगठा दान देणारा एकलव्य, हा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत प्रेरणादायी असून त्याचे हे चरित्र लेखकांनी अत्यंत प्रभावीपणे आपल्यासमोर ठेवले आहे. यातील पात्र त्यांचा संवाद आणि भावना याची सुयोग्य मांडणी देखील केलेली आहे. केवळ ध्वनीचा वेध घेऊन सावज टिपणाऱ्या एकलव्याचे या कादंबरीत एकूण 51 प्रकरणातून 360 पानांमध्ये वेगवेगळ्या अंगांनी सुंदर चित्रण केले आहे. हि कादंबरी प्रत्येकांनी वाचली पाहिजे.
यानंतर झालेल्या चर्चेत कु.प्रतिक्षा लोहकरे, कु. दिपाली शेळके, शांता कलबुर्गे, मोहन निडवंचे, बालाजी सुवर्णकार, वर्षाराणी चव्हाण, प्रियंका मुंढे ,भागवत जाधव, कु.म्हेत्रे प्रियंका,
सुरेखा गुजलवार व ज्ञानोबा मुंढे यांचेसह अनेक लहान मोठ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी प्रत्येकाच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे पैके यांनी दिली.
अध्यक्षीय समारोपात मोमले रामराव यांनी शौर्याचे तोंड भरून कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य भास्कर जाधव यांनी केले तर संवादकाचा परिचय आराध्या तांदळे या मुलीने करून दिला. प्रतिभा मुळे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास , जेष्ठ नागरिक संघाचे मुरलीधर जाधव, रामभाऊ जाधव, ब्लड बँकेचे डॉ.बी.एम.शेटकार, आर्यसमाज प्रतिनिधी अर्जुनराव सोमवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी संयोजक अनंत कदम, प्रा.राजपाल पाटील, आनंद बिरादार, हणमंत म्हेत्रे, सुरेश वजनम आदींनी परिश्रम घेतले
