सत्यजित पाटील (आबा) यांच्या प्रचारार्थ संविधान सन्मान समितीची शाहूवाडीत एल्गार सभा
वाढत्या उन्हाबरोबर प्रचाराचा जोर वाढला
शाहूवाडी (शिवाप्पा पाटील) : मोदी सरकार संविधान विरोधी असून संविधान बदलून देशात हुकूमशाही आणण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. ज्या संविधानामुळे आपल्या देशात लोकशाही रुजली आणि वाढली त्या संविधानाच्या रक्षणासाठी हाती 'मशाल' घेऊन अमित शहा, मोदी यांचे विखारी मनसुबे उधळून लावूया, असे धडाकेबाज वक्तव्य शेकापचे ज्येष्ठ नेते भाई भारत पाटील यांनी केले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे (महाविकास आघाडी) अधिकृत उमेदवार सत्यजित पाटील (आबा) सरूडकर यांच्या प्रचारार्थ शाहूवाडी येथे मंगळवार (ता. ३०) रोजी मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना श्री. पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडली. पुढे बोलताना भाई भारत पाटील म्हणाले की, सद्यःस्थितीत समाजातील कोणताही घटक समाधानी नाही. मोदी फक्त घोषणा करतात वास्तवात मात्र काहीही करत नाहीत. त्यांच्या फसव्या गॅरंंटीला, जाहिरातीला जनता यावेळी फसणार नाही असेही श्री. पाटील म्हणाले. राजाभाऊ मगदूम म्हणाले की, मोदी सरकारने काही बड्या उद्योगपतींना २५ लाख कोटींची कर्जात सवलत दिली. मात्र, त्यांच्याकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविण्यास पैसे नाहीत. मोदींनी १० वर्षांत शेतकऱ्यांना काय दिले याचा आपण गंभीरपणे विचार करावा, असेही श्री. मगदूम म्हणाले.
आपल्या तालुक्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्यजित आबा सरुडकर हा एकमेव पर्याय आहे. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी, आपले प्रश्न संसदेत मांडणारा हक्काचा खासदार म्हणून निवडून देण्यासाठी सत्यजित पाटील यांच्या पाठीशी मोठ्या ताकतीने उभे राहूया, शाहूवाडी-पन्हाळ्यातून त्यांना मोठी लीड देऊया, विजयाचा गुलाल उधळण्यासाठी अथक परिश्रम घेऊया, आबांचे निवडणूक चिन्ह 'मशाल' घरोघरी पोहचवूया, त्यांना दिल्लीला पाठवूया, असा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.
ही एल्गार सभा ओम गणेश फंक्शन हॉल, शाहूवाडी येथे झाली. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांतही भर दुपारी झालेल्या या बैठकीला स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सभेला भाई भारत पाटील, राजाभाऊ मगदूम, राजेंद्र देशमाने, दत्तात्रय कदम (कापशी), गोपाळराव पाटील, अर्जून पाटील, नाथा पाटील (मोळवडे), नामदेव पाटील (माण), बापू कुंभार, तुकाराम पाटील, पळसे आण्णा, आनंदा पाटील (जावली), शामराव पाटील (परखंदळे) आदींसह शाहूवाडी व पंचक्रोशीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट : शाहूवाडी तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचा एक कट्टर असा कार्यकर्ता गट आहे. या गटाने दोन ते चार कार्यकर्त्यांचे ग्रुप पाडून गळ्यात 'उबाठा' गटाचा पट्टा, डोक्यावर मशाल चिन्हाची टोपी, खिशाला बिल्ला असा पेहराव करून 'घर टू घर' अशीही प्रचार मोहीम सुरू केली आहे. यामुळे सत्यजित पाटील सरूडकर यांचा प्रचार डोंगर, वाडी-वस्तीपर्यंत, गावागावांत होताना दिसत आहे. एकंदरीत, माजी आमदार सरुडकरांच्या समर्थनार्थ शाहूवाडी तालुक्यात प्रचाराने जोर धरला असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.
