उदगीर (एल.पी.उगीले) पुस्तक दिनाचे औचित्य साधून मनस्वी वाचकांना ग्रंथ प्रेमी सन्मान देऊन उदगीरमध्ये गौरवण्यात आले.डॉ.प्रवीण मुंदडा ,अर्चना पैके व विश्वास पडिले यांचा गौरव करण्यात आला.
मसापच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य रामचंद्र तिरुके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, डॉ.रामप्रसाद लखोटिया, आदर्श शिक्षक विश्वनाथ मुडपे, साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य धनंजय गुडसूरकर व राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका अनिता यलमटे हे उपस्थित होते .
सजग वाचक म्हणून अर्चना पैके यांना एक लाख रुपयांचा 'स्वप्निल कोलते पुरस्कार' मिळाल्याबद्दल त्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.आपल्या दैनंदिन कार्यातून वाचनासाठी वेळ काढून वाचन करणारे व ग्रंथ खरेदी करून वाचनाप्रती बांधिल असणारे डॉ. प्रविण मुंदडा व विश्वास पडीले यांचा मनस्वी वाचक सन्मान देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.ग्रंथ वाचन चळवळीला बळ मिळावे, यासाठी ग्रंथांच्या संदर्भाने दरवर्षी वाचन प्रेमींचा पुस्तक दिनी अशा गौरवाचे आयोजन केले जात असल्याचे संयोजक धनंजय गुडसूरकर व अनिता येलमटे यांनी सांगितले .
यावेळी प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के म्हणाले," आपण पुस्तकांच्या वाटेने गेलो नसतो तर आज या ठिकाणी पोहोचलोच नसतो. पुस्तकांच्या पानांनी मातेबद्दल व माती बद्दल संवेदनशीलता शिकवली. म्हणूनच जीवनातील कटू प्रसंगांना सामोरे जाताना पुस्तके हे दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरले" असे नमूद केले. डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी सर्वांना पुस्तक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ग्रंथ चळवळ सक्रिय करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.अध्यक्षीय समारोपात रामचंद्र तिरुके यांनी उदगीर मध्ये संपन्न झालेल्या साहित्य संमेलनाच्या आयोजनामागे ग्रंथ वाचनाचीच प्रेरणा होती. उत्तम लेखक व वाचक हे समाजाचे अक्षय धन आहेत, असे नमूद केले.
डॉ.प्रविण मुंदडा, अर्चना पैके व विश्वास पडिले यांनीही मनोगत व्यक्त केले. धनंजय गुडसूरकर यांनी या उपक्रमाचे प्रयोजन सांगितले तर अनिता येलमटे यांनी या मागची पार्श्वभूमी स्पष्ट केली . मागील वर्षाचे ग्रंथप्रेमी सन्मानाचे मानकरी सुनिल पुल्लागोर यांनी सुत्रसंचालन तर सुरेखा गुजलवार यांनी आभार मानले.
