रोख ठोक:: ऍड. एल.पी.उगीले
अडीतला एखादा कांदा जर नासका निघाला, तर संपूर्ण अडीच नासवून टाकतो, असे म्हणतात. कधी कधी ग्रामीण भागात जे म्हणतात, "ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. "काहीसा तसाच प्रकार एसटी महामंडळात सुरू झाला की काय? असे आता चर्चिले जाऊ लागले आहे. कारण एसटी महामंडळामध्ये यापूर्वीही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर आगार येथे आगार व्यवस्थापक यांच्या केबिनमध्येच एका वाहकाने सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुतपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून त्याच्यावर कारवाई केली होती.
या कारवाईची मजेशीर चर्चा आगारामध्ये कित्येक दिवस चालली, आता कुठे ती गोष्ट विसरत चालली होती, मात्र पुन्हा एकदा या गोष्टीची चर्चा होण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ लातूर आगारातील आगार व्यवस्थापक वर्ग 2, बालाजी वसंतराव अडसुळे (वय 50 वर्ष) यांनी आपल्याच विभागातील एसटी बसचे चालक यांना त्यांच्या रजा रोखीकरण आणि अर्जित रजेच्या संदर्भात योग्य कारवाई करून, घरी लग्नकार्य असल्यामुळे व घराचे बांधकाम काढल्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांनी आगार प्रमुख यांच्याकडे 20 मार्च रोजी विनंती अर्ज करून, रजा रोखीकरण मंजूर करण्याची विनंती केली होती. मात्र या कामामुळे ज्या चालकाचा फायदा होणार होता, त्याने आपल्याला काहीतरी द्यावे. अशी लालसा आगारप्रमुखाच्या मनामध्ये निर्माण झाल्याने, सदरच्या रजा मंजुरीच्या अनुषंगाने तक्रारदार हे पाच एप्रिल रोजी आगार व्यवस्थापक बालाजी अडसुळे यांच्याकडे गेले असता, अडसुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अर्जित रजा व रजा रोखीकरण मंजूर केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने आणि लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एकूण कामकाजावर पूर्ण विश्वास असल्याने, तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार केली. सदरील तक्रारीची दखल घेऊन, दिनांक 8 एप्रिल रोजी शासकीय पंचा समक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक अडसुळे यांनी तक्रारदार यांना दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यानच्या काळात आरोपी लोकसेवा आडसुळे हे शिखर शिंगणापूर येथे यात्रा कर्तव्य बजावण्या करिता गेले होते. शिखर शिंगणापूर येथील कर्तव्य बजावल्यानंतर ते जेव्हा 22 एप्रिल रोजी लातूर आगारात कर्तव्यावर हजर झाले, तेव्हा सदरील लाचेची रक्कम अडसुळे यांनी स्वतःच्या कार्यालयात शासकीय पंचाच्या समक्ष स्वतः स्वीकारली. त्यावेळी आरोपीस सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले.
लातूर येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आरोपी लोकसेवक बालाजी वसंतराव अडसुळे यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिनियमाच्या अनुसार कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. सदरील सापळा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे यांच्या सूचनेनुसार सापळा पथकाचे प्रमुख लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली आणि त्यांची पूर्ण टीम यांनी हा सापळा यशस्वी केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली हे करत आहेत.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम, दलाल, एजंट यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे माहिती कळवावी. तक्रारदार किंवा माहिती कळवणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. असे जाहीर केले आहे.
