उदगीर (एल. पी. उगिले)
विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये सातत्य ठेवून जिद्दीने अभ्यास केल्यास यश हमखास मिळते. एखाद्या वेळेस अपयश आल्यास खचून जाऊ नये, यश मिळवणारच या जिद्दीने अभ्यास करावा. यश मिळतेच. असा विश्वास डॉ. स्नेहल वाघमारे यांनी चांदेगाव येथील सत्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केला.
उदगीर तालुक्यातील मौजे चांदेगाव येथील रहिवासी असलेले डॉ. स्नेहल वाघमारे यांनी मोठ्या जिद्दीने यूपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. मात्र तीन वेळा प्रयत्न करूनही अंतिम परीक्षेमध्ये काही ना काही अडचणी येत गेल्या, आणि त्यांना यशाने हुलकावणी दिली होती. मात्र जिद्द ठेवून त्यांनी पुन्हा तयारी केली, आणि परीक्षा दिली.
नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये डॉ. स्नेहल वाघमारे यांनी मोठे यश मिळवले आहे. मध्यंतरीच्या काळात आपण यशस्वी होऊनच गावाकडे जायचा निर्धार स्नेहल वाघमारे यांनी ठेवला होता. त्यामुळे तो कधी यशस्वी होतो, आणि कधी गावाकडे येतो. याची आतुरता ग्रामस्थांना आणि नातलगांना होती. कर्म धर्म संयोगाने चांदेगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचा मुहूर्त आणि डॉ. स्नेहल वाघमारे यांचा निकाल जाहीर होणे याचा योग जुळून आल्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक सूर्यकांत शिरसे, चंद्रकांत शिरसे, चांदेगावचे सरपंच मुसने, धनंजय गुडसुरकर, शिवाजीराव देवनाळे, डॉ. व्यंकट सूर्यवंशी, बाबुराव वाघमारे, दीपक वाघमारे यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. प्रथमतः स्नेहल वाघमारे यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण डॉ. स्नेहल वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच सुधाकर मुसने यांनी त्यांचा नागरिक सत्कार केला. तसेच ज्ञानसागर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सूर्यकांत शिरसे आणि चंद्रकांत शिरसे यांनीही सत्कार आणि स्वागत केले. या प्रसंगी अभिजीत गायकवाड, एन जी सोमवंशी, दिलीप गायकवाड, भरत कदम इत्यादी मान्यवरांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना स्नेहल वाघमारे यांनी विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबुराव वाघमारे यांनी तर आभार संजय देवनाळे यांनी मानले. या प्रसंगी नितीन वाघमारे, विनायक वाघमारे, राहुल कांबळे, अमरजीत वाघमारे, करण वाघमारे, तात्याराव शिंदे, रितेश वाघमारे, बालाजी कांबळे, दत्ता वाघमारे, सचिन शिंदे, अमोल वाघमारे इत्यादींनी या सत्कार सोहळ्यासाठी परिश्रम घेतले.
