Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील बहुतांश मतदार आजही शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत रोहित पवार

                लातूर (एल.पी.उगीले) महाराष्ट्रातील राजकारण खालच्या थराला नेऊन ठेवण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असले तरी बहुतांश सर्वसामान्य माणूस, मतदार हे हे राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबतच आहेत असा विश्वास रोहित पवार यांनी लातूर शहरात पत्रकारांशी बोलताना पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. पुढे काही प्रश्नांची उत्तरे देताना त्यांनी असे स्पष्ट केले की,आपल्याकडे बहुमत असतानाही भाजपची नेतेमंडळी अन्य पक्षात फूट पाडून आकड्यांची गोळाबेरीज करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येत असल्यामुळे देशभरातील जनता, मतदार भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहेत, हे स्पष्ट होते.

   आपल्या लातूर दौऱ्यात आ. रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मध्यंतरी निर्माण झालेल्या पेचप्रसंगानंतरही सामान्य माणूस, मतदार भक्कमपणे पक्षाचे संस्थापक  राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा असल्याचे सांगितले. काही मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षातून बाहेर पडली असली तरी आपण लोकांचा विश्वास गमावलेला नाही. लोकांचा हा विश्वास कायम ठेवण्यासाठी पुनश्च एकदा आपल्याला संघर्षाचा मार्ग स्विकारावाच लागणार आहे. आपल्या उभ्या आयुष्यात शरद पवार यांनी जपलेले विचार टिकविण्यासाठी संघर्ष करावाच लागणार आहे. भारतीय जनता पार्टी हा संघर्ष दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता जास्त आहे. तरी सुध्दा महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्ली पुढे कधी झुकला नाही व यापुढेही झुकणार नाही. असा निर्वाळा आ. रोहित पवार यांनी दिला.

अजितदादा पवार आणि काही मंडळी राष्ट्रवादीतून बाहेर पडली. या मंडळीपुढे त्यांच्या वैयक्तिक अडचणी असू शकतात. अजीतदादांच्या या भूमिकेमुळे पवार घराण्यात फूट पडली अशा वल्गनाही काही मंडळी करताना दिसतात. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी व परिवार परिवाराच्या ठिकाणी असला पाहीजे. व्यक्तीचे विचार , मतप्रवाह भिन्न असू शकतात. राजकारण आणि परिवार या दोन बाजू वेगळ्या असल्याने त्या एकत्रित जोडण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असेही आ. पवार म्हणाले.

 शरद पवारांचे कणखर नेतृत्व सर्वमान्य आहे, ते विरोधकांनी एकत्रित करून स्थापन केलेल्या इंडिया आघाडीतील प्रमुख नेते आहेत. भाजपाला पुन्हा केंद्रात सत्तेत यायचे असेल तर त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर इंडिया आघाडी ठरणार आहे. म्हणून इंडियाच्या घटक पक्षात फूट पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शरद पवारांच्या महाराष्ट्र धर्माच्या, संघर्षाच्या भूमिकेवरून येणाऱ्या काळात आमच्यावरही भाजपकडून काही ना काही कारवाई होईल, अशी शंका व्यक्त करून आ. रोहित पवार यांनी राज्यातील सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, विकास कामांकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सराचिटणीस सौ. आशाताई भिसे, प्रदेश सचिव संजय शेटे, महेश तपासे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार यासह मान्यवरांची उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.