उदगीर / एल.पी.उगीले
महाराष्ट्र,कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रा सीमेवरील उदगीर हे ऐतिहासिक शहर आहे. शिक्षण , उद्योग , व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचे शहर म्हणून महाराष्ट्र , कर्नाटक , तेलंगाना राज्यात उदगीरची ओळख आहे. आता ऐतिहासिक उदगीर शहराची ओळख प्रशासनाच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे अवैध धंद्यांचे केंद्र म्हणून नवीन इतिहास रचला जातो की काय? अशी शंका लोक घेऊ लागले आहेत. . उदगीरात सर्वच अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात चालू असून या अवैध धंद्यांना राजकीय वरदहस्त लाभल्याची चर्चा असल्याने उदगीरचे आमदार तथा राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी याकडे लक्ष देऊन अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रशासनातील संबंधितांना ताकीद द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दिवसेंदिवस शहर व उपनगराची लोकसंख्या वाढत असून त्याच प्रमाणात रहदारी वाढू लागली आहे. सध्या शहराची लोकसंख्या सुमारे दोन लाखांच्या आसपास आहे. ऐतिहासिक नगरी म्हणून एक वारसा जपला जात असतानाच आता अवैध धंद्याचा इतिहास रचून अवैध धंद्याचं माहेर घर अशी नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न तर प्रशासनाचा नाही ना? अशीही शंका घेतली जात आहे. याचबरोबर शहर व परिसरात अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ गुटखा कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणावर उदगीर शहरात आयात होत आहे. शहरातील सर्व पानटपरी , छोट्या किराणा दुकानातून प्रतिबंधित अन्नपदार्थ असलेल्या गुटख्याची खुलेआम सर्रासपणे विक्री होत आहे. कर्नाटक राज्यातून प्रतिबंधित गुटख्याची आयात करून शहरातील पानटपरी , किराणा दुकानदाराला पुरवठा करणारा गुटखाकिंगला कोणाचा आशीर्वाद आहे ? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने अधून मधून थातूरमातूर कारवाई केल्याचे दाखवून चमकोगिरी केली जात असली तरी वास्तविक पाहता अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, प्रतिबंधित गुटखा विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचे काम अन्न भेसळ विभागाचे असल्याचे सांगितले जात असले तरी अपुरे मनुष्यबळ असे कारण सांगून तो विभाग याकडे लक्षच देत नसल्याचे दिसून येते. राज्य शासनाने राज्यात गुटखाबंदी केली असली तरी संबंधितांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री होताना पाहायला मिळते.
उदगीर तालुक्यासह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक वाढली आहे. काळा पिवळीला झालेल्या एका अपघातात सहा प्रवासी ठार झाल्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात कठोर कारवाई करून पोलीस निरीक्षकांना निलंबित केले होते. पुन्हा त्याच पद्धतीने ही प्रवासी वाहतूक बोकाळली असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी, कोणता अपघात होण्याची वाट पाहत आहेत की काय? शहरामध्ये या अवैध वाहतुकीच्या थांब्यामुळे आणि वाहतूक नियंत्रणासाठी ठेवलेली पोलीस प्रशासन यंत्रणा या अवैध प्रवासी वाहतुकीला शिस्त लावण्यात मशगुल असल्याने शहरांमध्ये वाहतूक विस्कळीत झाली आहे.शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी दोन बैठका घेण्यात आल्या होत्या. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहरात चार ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभी करण्यात आली. मात्र शहर पोलिसांच्या उदासीनतेमुळे सिग्नल यंत्रणा असूनही बंदच आहे. त्यामुळे शहरात बेशिस्त वाहतुकीने कळस गाठला आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांचा जीव गुदमरत चालला आहे. वाहतूक आढावा बैठकीत शहरातील अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनांची थांबे शहराबाहेर हलविण्यात यावेत, असे सांगण्यात आले होते. पोलिसांच्या वतीने शहरातील बसस्थानक परिसर , छत्रपती शिवाजी महाराज चौक , देगलूर रोड , दुधिया हनुमान मंदिर या भागातील अवैध प्रवासी वाहतुकीची थांबे काही दिवस शहराबाहेर हलविण्यात आली होती. परंतु काही दिवसातच पुन्हा अवैध प्रवासी वाहतुकीची थांबे छत्रपती शिवाजी महाराज चौक , बसस्थानक परिसर , देगलूर रोड आदी ठिकाणी पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. शहरात विनापरवाना ऑटोरिक्षाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. भररस्त्यात कोठेही वेडीवाकडी ऑटोरिक्षा उभी करून रहदारीस अडथळा निर्माण करण्यात येतो. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी झालेल्या बैठकीत आरटीओच्या प्रतिनिधीने स्पष्ट केले होते की शहरात जवळपास चार हजाराहून अधिक विनापरवाना ऑटो चालतात. त्यानंतर एक वेळ पोलीस प्रशासन आणि आरटीओ यांची मोहीम राबवली गेली. मात्र पुन्हा येरे माझ्या मागल्या... अशी अवस्था झाली आहे. विनापरवाना ऑटोरिक्षांकडे आरटीओ व स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. याचबरोबर शहरातून तालुक्यातील अनेक गावात होणारा अवैध देशी - विदेशी दारूचा पुरवठा , शहरातील गल्लीबोळातील जुगार अड्डे याकडे संबंधित प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.
