उदगीर / प्रतिनिधी
शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे फुल मधले असून सिग्नल हे असून वळंबा नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे.शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ५० लाख रुपये खर्चून सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली आहे. परंतु पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सिग्नल यंत्रणा शोभेची वस्तू ठरली आहे. उदगीरात बेशिस्त वाहतुकीमुळे मागच्या काळात अनेकांचे बळी गेलेले आहेत. शहरातील चार ठिकाणची सुव्यवस्थित असलेली सिग्नल यंत्रणा नेमकी बंद कशासाठी ? याबाबत नागरिकांमधून उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
लातूर जिल्ह्यातील ऐतिहासिक उदगीर शहर महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा राज्याच्या सीमेवरील महत्त्वाचे शैक्षणिक व व्यापारी केंद्र आहे. त्यामुळे उदगीर शहरात महाराष्ट्र व सीमाभागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. उदगीर शहर व उपनगराची लोकसंख्या सुमारे दोन लाखांच्या आसपास आहे. त्याच प्रमाणात दुचाकी , चारचाकी व व्यावसायिक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. उदगीरचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी दीड वर्षांपूर्वी ना. बनसोडे यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसोबत वाहतूक आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी शहरात चार ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत काही दिवसातच ५० लाख रुपयांचा निधी नगरपालिकेला उपलब्ध करून दिला होता.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक , डॉ. झाकिर हुसैन चौक , कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी चौक , शहर पोलीस स्टेशन समोर अशा चार ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली. गतवर्षी शहरातील मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने सिग्नल यंत्रणा बंद ठेवण्यात आली होती. परंतु मुख्य रस्त्याचे काम पूर्ण होऊन आठ महिन्यांचा कालावधी जाऊनही सिग्नल सुरू झाले नाहीत. गेल्या महिनाभरापूर्वी शहर पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नारळ फोडून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली होती. परंतु कुठे काय आडवे गेले कोणास ठाऊक ? दोन दिवसात सिग्नल यंत्रणा पुन्हा बंद झाली.
ना. संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दीड महिन्यापूर्वी येथील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात वाहतूक आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये उपस्थित नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला होता. या बैठकीत अनेकांनी अनेक उपाययोजना सुचविल्या होत्या. परंतु बैठकीच्या दोन महिन्यानंतरही उदगीरच्या बेशिस्त वाहतुकीला अद्यापही शिस्त लागलेली नाही. पोलीस प्रशासनाच्या वतीने हातावर पोट असणाऱ्या रस्त्यावरील पथविक्रेते , हातगाडेवाले , भाजीपाला विक्रेते यांना हाकलून देण्यात येत आहे. मात्र रहदारीस अडथळा आणणारे अवैध प्रवासी वाहतुकीची थांबे शहराबाहेर हलविण्यात आलेले नाहीत. भररस्त्यात उभारण्यात येणारी वाहने , ऑटो रिक्षा यांना अद्यापही शिस्त लागलेली नाही. वारंवार होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे शहरातील नागरिकांचा जीव दिवसेंदिवस गुदमरत चाललेला आहे.
---------------------------------------------------
चौकट
वाहतूक आढावा बैठक ; त्याच त्या मुद्द्यांचे गुऱ्हाळ !!
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ना. बनसोडे यांनी दीड वर्षात दोन वेळा जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या समवेत वाहतूक आढावा बैठक घेतली. काही दिवसांपूर्वीच घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत वाहतुकीस शिस्त लावण्याचे प्रशासनाला निर्देश दिले होते. याही बैठकीत राजकीय नेत्यांनी आपापल्या कार्यकाळात झालेल्या विकासाचे मुद्दे तसेच एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचाही प्रयत्न केला. त्याच त्याच मुद्द्यांचे अनेकांनी गुऱ्हाळ केले.
वाहतुकीला शिस्त लावणारी सिग्नल यंत्रणा अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही. वाहतूक आढावा बैठकीत ना. बनसोडे यांनी बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याचे निर्देश देऊनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहतूक व्यवस्था सुधारत नाही. पोलिसांकडून घेण्यात आलेली वाहतूक आढावा बैठक म्हणजे केवळ गुऱ्हाळाचीच कहाणी असल्याची चर्चा होत आहे.
