उदगीर (सुरेश बोडके) भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे लोक कुठे शेण खावे? याचे काही तारतम्य बाळगत नाहीत. परिणामतः अनेक राष्ट्रीय कार्यात देखील ते भ्रष्टाचार करण्यासाठी सज्ज होत असतात, त्यांच्या अशा भ्रष्ट प्रवृत्तीला काही मर्यादा नाहीत. ज्यांनी लाज, लज्जा, राष्ट्रप्रेम याला तिलांजली दिली आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी? असा प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती उदगीर तालुक्यातील लोणी या गावात निर्माण झाली आहे.
लोणी येथे वन विभागाच्या वतीने राष्ट्राचा शाश्वत विकास व्हावा, आणि वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाला गती यावी. यासाठी जनतेला प्रबोधन करावे आणि दर्जेदार वृक्षांचे रोपे उपलब्ध करून द्यावीत, या उद्देशाने लोणी येथे रोपवाटिका सुरू केली आहे. मात्र या रोपवाटिकेत भ्रष्टाचाराचे बीजारोपण झाल्याने निर्माण होणारी झाडे देखील भ्रष्ट होतील! आणि ती लावणारे हात देखील भ्रष्ट होतील!! अशी चर्चा या भागात मोठ्या प्रमाणात चालू आहे. यासंदर्भात समजलेली माहिती अशी की, उदगीर तालुक्यातील लोणी या गावात वनविभागाची रोपवाटिका आहे. त्या रोपवाटिकेवर बोगस मजूर दाखवण्यासाठी वन विभागाचा एक कर्मचारी आणि रोपवाटिका असलेला शेतमालक मदनुरे यांनी संगणमत करून ग्राम रोजगार सेवकाची आयडी त्याला न माहिती होऊ देता वापरून बोगस मजूर दाखवले आहेत, असा आरोप केला जात आहे. तसेच रोपवाटिका दर्जेदार तयार करण्यासाठी जी आदर्श मूल्य सांगितले जातात, त्याला तिलांजली देऊन अत्यंत खालच्या दर्जाची माती वापरून त्यामध्ये ना शेणखत आहे, ना रोप व्यवस्थित वाढावे यासाठी वापरला जाणारा गांडूळ खत आहे!
निकृष्ट दर्जाची माती आणि निकृष्ट दर्जाचे विचार घेऊन रोपवाटिका सुरू करण्यात आली असल्याने आणि त्यामध्ये भ्रष्टाचाराचे बिजारोपण झालेले असल्यामुळे भ्रष्टाचाराचेच झाडे वाढतील !! आणि सर्वत्र भ्रष्टाचारच भ्रष्टाचार फोफावेल !!! अशी गमतीशीर चर्चा चौकात चौकात चालू आहे.
या रोपवाटिकेमध्ये भ्रष्ट प्रवृत्तीमुळे रोप व्यवस्थित तयार होत नाहीत. तयार रोपवाटिका वरिष्ठांना दाखवीत नाहीत. अशा पद्धतीचा अनागोंदी कारभार सुरू असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास निश्चितपणे या ठिकाणी झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणार नाही. तसेच शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या भ्रष्ट प्रवृत्ती देखील उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत, बोगसगिरी करून रोपवाटिकेसारख्या पवित्र कामात देखील भ्रष्टाचार करणाऱ्या वन विभागातील त्या झारीतल्या शुक्राचार्याची आणि त्याला हा सर्व प्रकार करायला लावणाऱ्या भ्रष्ट शेतकऱ्याची उच्चस्तरीय चौकशी केली जावी. इतकेच नव्हे तर गावात देखील चौकशी केल्यास त्या बोगस प्रकरणाचे धिंडवडे निघाल्याशिवाय राहणार नाहीत. शासनाला फसवणाऱ्या आणि बोगसमजूर दाखवणाऱ्या रोपवाटिका चालकावर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 420 प्रमाणे गुन्हे दाखल करावे. आणि लाखो रुपये शासनाचे लुटलेली ती रक्कम व्याजासह वसूल करावी. अशा पद्धतीचे निवेदन वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना व वनक्षेत्रपालांना देण्यात आले आहे. सदरील निवेदनावर पत्रकार तथा संपादक अनिल जाधव, प्रभुदास गायकवाड, सुनील मादळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी नाही झाल्यास तसेच दोषी व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा संबंधितांच्या विरोधामध्ये आंदोलन केले जाईल. असा इशाराही सदर निवेदनामध्ये देण्यात आला आहे.
