मद्य सम्राट यांना पोलिसांकडून कशासाठी सूट?
उदगीर (प्रतिनिधी) उदगीर शहरातील आणि ग्रामीण भागातील ही काही परमिट रूम मध्ये तळीरामांची लूट केली जात आहे. अशी तक्रार तळीराम करत आहेत .यामध्ये प्रामुख्याने उदगीर शहरातील विकास बार, सिटी बार, सेंटर पॉईंट, अमृता बार, ओके बार या ठिकाणी इतर परमिट रूम आणि बार पेक्षा कमी किमतीमध्ये नशा करता येते. अशा धारणेतून मद्यपी जातात. मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना आलेले अनुभव हे अत्यंत धक्कादायक आहेत. चार पाच रुपयांच्या किमतीचा विचार करून त्या ठिकाणी जाणाऱ्या तळीरामांना त्या त्या बार आणि परमिट रूमच्या व्यवस्थापकाकडून वेगवेगळ्या कारणाने लुबाडले जात आहे, अशी ओरड तळीराम करत आहेत.
यामध्ये प्रामुख्याने तळीरामांना मद्यपान करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्लास्टिक ग्लास ची किंमत पाच रुपये लावली जात आहे. कित्येक वेळा हे ग्लास अगोदरच लिक झालेले असल्यामुळे गळायला लागतात, या संदर्भात दुसरा ग्लास द्या म्हणून मागणी केल्यास पुन्हा त्याचे पाच रुपये जास्तीचे आकारले जातात. आणि या संदर्भात कुठे तक्रार करायचे असेल तिथे जाऊन तक्रार करा. अशा पद्धतीचा उरमट सल्ला दिला जातो. या सर्व प्रकारामुळे तळीराम चांगलेच वैतागले आहेत. गंमत म्हणजे हे सर्व बार आणि परमिट रूम मद्य सम्राटांचे असल्याची चर्चा असल्याने त्यांच्यासमोर लोटांगण घालणाऱ्या पोलीस प्रशासनाने त्यांना कशासाठीही सूट दिली? हा प्रश्न तळी रामाला पडलेला आहे.
ही एक बाजू तर दुसऱ्या बाजूला अनेक बार आणि परमिट रूम मधून बनावट आणि परराज्यातून आलेली रसायन मिश्रित दारू विक्री होत असल्याची ही ओरड आहे. उदगीर शहराजवळूनच काही ठिकाणी अशा पद्धतीची रसायन मिश्रित दारू बनवली जात असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे. हे सर्व होत असले तरीही पोलीस प्रशासन मात्र गप्प आहे. पोलीस प्रशासनाचे हे गप्प राहणे म्हणजे अशा अवैध धंद्यांना मूक संमती दिल्यासारखे आहे. त्याचा परिणाम म्हणूनच उदगीर सारख्या सुसंस्कृत शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात मोकाळात चालले आहेत. अवैद्य बनावट आणि विषारी दारूचा महापूर उदगीर शहरात पाहायला मिळतो आहे. यावर वेळीच अंकुश ठेवणे गरजेचे आहे.