Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आगामी सण-उत्सवच्या अनुषंगाने पोलिसांचे मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन, ठिक-ठिकाणी नाकाबंदी व वाहन तपासणी मोहीम

 


लातूर (एल.पी.उगीले)

                     आगामी सण उत्सव आषाढी एकादशी व बकरीईद च्या अनुषंगाने सदरचे सण-उत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने संपूर्ण लातूर जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले होते. त्यानुसार, दिनांक 26 व 27 जून चे मध्यरात्री 11 ते  पहाटे 5 वाजेपर्यत लातूर पोलिसाकडून संपूर्ण लातूर जिल्ह्यात कोंबिंग  ऑपरेशन राबविण्यात आले. या आधीपण कोंबिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्येही गुन्हेगारावर मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात आली होती.दिनांक 26 ते 27 जून चे मध्यरात्री राबविण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन करून जिल्ह्यातील 37 अधिकारी व 140 पोलीस अंमलदारांची अनेक पथके तयार करून मोठ्या प्रमाणावर, प्रभावीपणे कोंबिंग ऑपरेशन राबविले. 

              कोंबिंग ऑपरेशन दरम्यान  फरार आरोपी अटक करणे, लॉज व हॉटेल चेक करणे, पॅरोल आदेशाचा उल्लंघन केलेल्या आरोपींचा शोध घेणे, संशयीत वाहने तपासणे, अभिलेखावरील गुंडाचा/गुन्हेगारांचा शोध घेणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करणे अशा प्रकारच्या कारवाईचा सामावेश होता. 

              त्यानुसार लातूर पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन मध्ये 84 लॉजेस व हॉटेलची तपासणी करण्यात आली,  जिल्ह्यात विविध 29 ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करून 822 संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. 05 मर्मस्थळाची तपासणी करण्यात आली. पोलीस रेकॉर्ड वरील 96 सराईत गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून मालाविषयक गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वतःचे अस्तित्व लपवून दबा धरुन बसलेल्या 10 इसमाविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122(क) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

            जुगार कायद्यान्वये 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात, प्रभावीपणे कोंबिंग ऑपरेशन मध्ये केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सदरच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी सहभागी झाले होते.

             तसेच लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बकरी ईद,आषाढी एकादशी व इतर सण उत्सव साजरे होणार असून त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांचे निर्देशान्वये अनेक पोलीस ठाणे हद्दीत ग्रामभेटी चे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या ग्राम भेटीमध्ये ठाणे प्रभारी अधिकारी व बीट अंमलदार यांनी अनेक गावात शांतता समितीच्या बैठका घेऊन गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन आगामी सण उत्सव अतिशय  उत्साही वातावरणात, निर्विघ्नपणे पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता प्रत्येक गावात पोलीस दलातर्फे रूट मार्च चे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.