उदगीर / प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री माता भीमाई व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक २० डिसेंबर रोजी उदगीर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजप्रबोधन, समता, स्वच्छता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या दोन थोर व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतींना यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी विनम्र अभिवादन केले.
माता भीमाई यांच्या १२९ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या त्यागमय जीवनकार्याची आठवण करून देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घडविण्यामागे माता भीमाई यांचा मोलाचा वाटा असून, कष्ट, संयम आणि संस्कार यांचे बीज त्यांच्या जीवनातूनच बाबासाहेबांना लाभले, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. तसेच राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या ६९ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्वच्छता चळवळीचे, समाजसेवेचे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य अधोरेखित करण्यात आले. गाडगे महाराजांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, स्वच्छता व सेवाभाव पोहोचविण्याचे कार्य केले, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य असल्याचे सांगण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते विद्यासागर डोरनाळीकर, बाबासाहेब सूर्यवंशी, डॉ. गोविंद सोनकांबळे, रवि सूर्यवंशी, अविनाश गायकवाड, सुनील पकोळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून माता भीमाई व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.
या वेळी बोलताना उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी माता भीमाई यांच्या त्यागातून व गाडगे महाराजांच्या सेवाभावातून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी, समाजात समता, बंधुता आणि माणुसकीचे मूल्य जोपासावे, असे आवाहन केले. अभिवादन कार्यक्रम शांततापूर्ण व सामाजिक जाणिवेच्या वातावरणात पार पडला.
