उदगीर (प्रतिनिधी)
शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना तंत्रज्ञानाबरोबरचं नैतिक मूल्यांची जनजागृती देखील तितकीच महत्त्वाची आहे. कोणतेही कार्य करीत असताना गुणवत्ता लक्षात घ्यायला हवी. याबरोबर विविध एजन्सी, सर्वेक्षण व प्रकल्पाद्वारे संशोधन करत असताना त्याचा समाजासाठी देखील उपयोग झाला पाहिजे, असे विचार नॅक व यु. जी. सी. कमिटीचे सदस्य, माजी प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ डॉ.एन एस. धर्माधिकारी यांनी मांडले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयासाठी नॅक बायनरी नवीन मान्यता प्रणाली या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.ए. काळगापुरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी प्राचार्य डॉ.एन.एस. धर्माधिकारी व कार्यशाळेचे संयोजक डॉ. विठ्ठल गोरे यांची उपस्थिती होती. बायनरी पद्धतीने नॅकला सामोरे जात असताना आपल्याला योग्य अशी दिशा मिळाली पाहिजे, या उद्देशाने सदरील कार्यशाळेच्या आयोजन करण्यात आले असल्याचे समन्वयक डॉ. विठ्ठल गोरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
पुढे बोलताना डॉ.एन.एस. धर्माधिकारी यांनी नॅक बायनरी नवीन प्रणालीत भारतीय ज्ञान प्रणाली, तंत्रज्ञान, समाज प्रबोधन, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, कौशल्य विकास, रोजगार, समाज उपयोगी संशोधन, मूल्य, विचार व उपक्रमातील नाविन्यता इत्यादी घटकाला अधिक प्राधान्य देण्यात आले. कामाचे सूक्ष्म नियोजन व स्मार्टपणा यामुळे प्रभावीपणे काम करता येते, असे सांगत नॅकला सामोरे जात असताना कोणती काळजी घ्यावी, या संदर्भात त्यांनी विस्ताराने भाष्य केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.ए.ए. काळगापुरे यांनी महाविद्यालयात प्रत्येक प्राध्यापकांनी विविध उपक्रम राबवायला हवेत. नॅकसाठी सामूहिक प्रयत्न देखील तितकेच महत्त्वाचे असतात.
कार्यक्रमास पंडित दीनदयाल उपाध्याय महाविद्यालय देवणी येथील प्राध्यापक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक व कार्यशाळेचे संयोजक डॉ.विठ्ठल गोरे यांनी मानले.
