उदगीर (एल. पी. उगिले)
उदगीर नगरपरिषद ही स्वच्छतेच्या बाबतीत सदैव अग्रेसर राहिलेली आणि अनेक पातळीवर स्वच्छतेच्या संदर्भात पारितोषक मिळवलेली नगरपरिषद आहे. असे असताना देखील गेली दोन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्याने आणि या ठिकाणी प्रशासक नियुक्त असल्यामुळे म्हणाव्या त्या गांभीर्याने नागरी सुविधाकडे लक्ष दिले जात नसल्याची ओरड जनतेतून होत आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. एका बाजूला उदगीर ही मोठी बाजारपेठ आहे, या ठिकाणी कापड व्यापार असेल, नाहीतर बैल बाजार असेल तसेच भाजीपालाचाही व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. अशा या मोठ्या बाजारपेठेमध्ये स्वच्छतेचे धिंडवडे निघत असतील तर, उदगीरचा हा नवीन पॅटर्न म्हणून ओळखला जाऊ लागेल.
नगर परिषदेने कंत्राटी पद्धतीने ठेवलेल्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळत असल्याची ही ओरड आहे. परिणामतः या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियानाला काळीमा फासून शहरातील नागरिकाचे आरोग्य रामभरोसे सोडले आहे. अनेक विभागांमध्ये घाणीचे ढीग साचलेले आहेत. तसेच शहरातील मुख्य रस्त्यालगतच्या नाल्या देखील स्वच्छ केल्या नाहीत. तसेच नगर परिषदेच्या कार्यालयाच्या खाली देखील सार्वजनिक मुतारी आणि शौचालयातील घाण बाजूच्याच नालीत पडत आहे. थोडी सुद्धा स्वच्छतेची जाण कोणाही कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्यांना कशी काय वाटत नाही? असा प्रश्न निर्माण केला जातोय.
या बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या मोठ्या व्यापारी संकुलात मुतारी आणि शौचालयाच्या सुविधा नावालाच बनवण्यात आले असल्या तरी, प्रत्यक्षात मात्र घाण आणि दुर्गंधीमुळे एवढी मोठी बाजारपेठ वेगवेगळ्या साथीच्या रोगाला निमंत्रण देणारी ठरू लागली आहे. तसेच बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना देखील या दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची ओरड होत आहे. सार्वजनिक शौचालयात घाणीचे साम्राज्य असल्यामुळे कित्येक वेळा पुरुष उघड्यावरच कार्यभार उरकून घेत असल्याने महिला ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची चर्चा आहे. नगरपालिका इमारतीच्या खालच्या बाजूला सर्वत्र घाणीचे साम्राज्य साचल्यामुळे दिव्याखाली अंधार म्हणतात, त्याचा प्रत्यक्ष प्रत्यय उदगीरकरांना या ठिकाणी येऊ लागला आहे.
या व्यापारी संकुलात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना, व्यापाऱ्यांना, ग्राहकांना साथीच्या रोगाची भीती वाटू लागली आहे. तशीच अवस्था उदगीर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बनशेळकी रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील अशाच पद्धतीचे ठिकठिकाणी घाणीचे ढीग आणि तुंबलेल्या नाल्या पाहायला मिळतात. समता नगर येथून डॅम रोड बोंद्रे निवास ते टिपू सुलतान चौक या रस्त्याच्या बाजूला अपूर्ण ठेवण्यात आलेल्या कामामुळे तसेच त्या ठिकाणी गिट्टी टाकून रस्ता बनवण्याचा केविलवाणा प्रकार केल्यामुळे नागरिकांना येजा करायला अडचण होत आहे. मध्यंतरीच्या काळात मुरूम टाकून दबाई केली होती, मात्र त्या थातूरमातूर कामाचे अवकाळी पावसाने धिंडवडे काढत, किती निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे? हे जनतेच्या समोर आणून ठेवले आहे. तसेच पावसामुळे मुरूम वाहून गेल्याने पावसाचे खड्डे आणि घाणीचे डबके अनेक ठिकाणी तयार झाले आहेत. या सर्व गोष्टीचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. इतकेच नाही तर या रस्त्यापासून जवळच असलेल्या प्रार्थना स्थळाकडे जायला देखील अल्पसंख्यांक समाजातील भाविकांना त्रास सहन करावा लागतो आहे. उदगीर शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी आल्याचा गवगवा केला जातो, मात्र प्रत्यक्षात अत्यंत खालच्या पातळीचे आणि निकृष्ट कामे केली जात असल्याची ओरड आता सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी तर कागदोपत्री स्वच्छता दाखवली गेली की काय? अशी शक्यता वर्तवली जाऊ शकेल इतक्या बोगस कामाचे प्रकारही लोकांना पाहायला मिळू लागले आहेत. या गोष्टीची नगरपालिकेने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.
