उदगीर (एल.पी.उगीले) भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस श्रद्धा संजय जगताप यांची निवड भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य म्हणून करण्यात आली आहे, ही निवड सार्थ असून श्रद्धा जगताप यांच्या या निवडीमुळे पक्षाची ताकद वाढणार आहे. तसेच निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. असे विचार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बसवराज पाटील कौळखेडकर यांनी व्यक्त केले.
सामाजिक जाणीव जपत राजकारण करणाऱ्या श्रद्धा जगताप यांच्या या निवडीबद्दल भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार उदगीर येथील दंडवते फंक्शन हॉल, कॅप्टन कृष्णकांत चौक येथे आयोजित करण्यात आला होता. या सत्कार प्रसंगी बसवराज पाटील कौळखेडकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे स्थानिक पदाधिकारी शंकरराव लासुणे, भारतीय जनता पक्षाचे उदगीर तालुकाध्यक्ष शिवशंकर धुपे, शहराध्यक्ष मनोज उदाले, नगरपरिषदेचे माजी सदस्य आनंद बुंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष महिलांच्या सर्वांगीण प्रगती सोबतच आर्थिक स्वावलंबनासाठी प्रयत्न करत आहे. आणि या कामासाठी श्रद्धा जगताप यांची सतत धडपड चालू असते, उदगीर पंचक्रोशी मध्ये त्यांनी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. पक्षाच्या ध्येयधोरणाला समोर ठेवून महिला सक्षम आणि स्वावलंबी झाल्या पाहिजेत. या दृष्टीने विविध कार्यक्रम आणि महिलांसाठी योजना प्रत्यक्ष राबवून लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचवण्याच्या कामी श्रद्धा जगताप सतत सक्रिय असतात, त्यांनी केलेल्या या उत्कृष्ट कार्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारणीत त्यांना संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या योजना आणि लाभार्थी महिला यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून शासनाच्या योजना लोकाभिमुख आहेत. याची जनजागृती करणे आणि उदगीर परिसरातील गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील महिला व मुलींना त्याचा लाभ मिळवून देणे या कामी श्रद्धा जगताप सतत सक्रिय राहून काम करत आहेत. केवळ राजकारणच नाही तर समाजकारण करत सर्वसामान्यांच्या मदतीला धाऊन जाणे हा श्रद्धा जगताप यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांच्या या निवडीचा निश्चितपणे भारतीय जनता पक्षाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. महिलांचे संघटन उभे करणे हे त्यांना सहज शक्य आहे. कारण त्यांच्यामध्ये संघटन कुशलता हा गुण पाहयला मिळतो, असेही सांगितले.
या सत्कार समारंभाचे नियोजन उदगीर तालुका भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्ष तथा सोमनाथपूर ग्रामपंचायत सदस्य शिवकर्ण अंधारे यांनी केले होते. याप्रसंगी महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी आणि सदस्य महिलाही उपस्थित होत्या.
सत्काराला उत्तर देताना श्रद्धा जगताप यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पक्ष जास्तीत जास्त लोकाभिमुख होणे यासाठी महिलांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या वतीने अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. त्याचा प्रत्यक्ष फायदा महिलांना मिळाला पाहिजे. यासाठी महिलांनी पुढे येऊन काम करावे असे आवाहन केले. आपली झालेली ही निवड आपल्यासाठी गौरवाची असून पक्षाने दाखवलेला विश्वास आपण सार्थ ठरवू. असेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन बिरादार सर यांनी केले.
